अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 'उडान'चे प्रकाशन

बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या 'उडान' या आत्मचरित्राचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया सभागृहामध्ये पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याला प्रफुल्ल पटेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी उपस्थित होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्याबद्दल जोरदार चर्चा देखील सुरू होती.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी, पण गोंदियामध्ये पीपीपी म्हणजे प्रफुल पटेल पार्टी- देवेंद्र फडणवीस

प्रफुल्ल पटेल हे मुरलेले राजकारणी आहेत. प्रफुल्ल पटेल आणि मी विदर्भातून आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यासोबत राजकीय लढाई आम्हीच करत असतो. शरद पवार यांची माफी मागून सांगतो की महाराष्ट्रात राष्ट्रवादी आहे, पण गोंदिंयामध्ये पीपीपी आहे, म्हणजे प्रफुल्ल पटेल पार्टी.

प्रफुल्ल पटेल विरोधी पक्षात असले तरी आपलेच वाटतात - उद्धव ठाकरे
प्रफुल्ल पटेल विरोधी पक्षात असले तरी आपलेच वाटतात. प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल बोलत आहे. आपल्याबद्दल नाही, कारण आपण सध्या सत्तेत एकत्र आहोत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली. प्रफुल्ल पटेल यांचे फिटनेसबाबत वेगळे सूत्र आहे. प्रफुल्ल पटेल उद्योगपती, राजकारणी यांच्याशी सहजतेने वागतात. तसेच शेतकऱ्यांशीही त्यांचे उत्तम संबध आहेत. असे सर्वच लोकांना जमत नाही.

प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या वडिलांचे खरे उत्तराधिकारी - अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन म्हणाले, माझे वडील नेहमी मला सांगायचे की माझा मुलगा म्हणून तू उत्तराधिकारी बनू नकोस, माझा उत्तराधिकारी बनून माझा मुलगा हो. तसेच प्रफ्फुल पटेल हे त्यांच्या वडिलांचे खरे उत्तराधिकारी आहेत.

वडिलांच्या मृत्यूने माझ्या आयुष्यात बदल घडला - प्रफुल्ल पटेल

आपल्या देशात असे काही लोक आहेत, त्यांना काहीतरी सांगण्याची गरज होती. पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूने माझ्या आयुष्यात बदल घडला. वडिलांच्या अंत्यसंस्काराला जमलेले लोक अक्षरश: रडत होते. त्या जमलेल्या लोकांनी शिकवले की तुमचे आयुष्य हे तुमच्यापेक्षा इतर लोकांसाठीही महत्त्वाचे असते.

मैत्री आणि संबंध जपणे हे प्रफुल्ल पटेलकडून शिकण्याची गरज - मुकेश अंबानी

प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत 35 वर्षांची मैत्री आहे. मैत्री करणे किंवा संबध तोडणे खूप सोपे आहे. मात्र मैत्री आणि संबध जपणे हे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शिकणे गरजेचे आहे. इथे जमलेल्या कित्येकांना याचा अनुभव आला असेल. प्रफुल्ल पटेल हे कोणत्याही कार्यक्रमाला असले तरीही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित हास्य असते.

पुढील बातमी
इतर बातम्या