मुंबई - बुधवारी शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीसाठी होणारा गदारोळ शिवसेनेकडून थांबेल असे वाटत होते. मात्र तसे गुरुवारी विधिमंडळात झाले नाही.
विधान सभेचे कामकाज सुरु झाल्यावर शेतकरी कर्जमाफी या विषयावरून गदारोळ होऊ लागला. अध्यक्षांच्या अनुमतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवर निवेदन सुरु केले. यावेळी काँग्रेस व एनसीपीचे आमदार वेलमध्ये उतरून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत होते.
साडे चार वर्षांत 16 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. भाजपा आणि शिवसेनेला शेतकरी कर्जमाफी मागण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले. मात्र यावेळी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांचे निवेदन संपेपर्यंत शांत होते. जेव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उभे राहिले तेव्हा शिवसेना आमदार वेलमध्ये घुसून शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी करू लागले. विखे-पाटील यांच्या भाषणानंतर अजित पवार यांनाही शेतकरी कर्जमाफीसंदर्भात बोलायचे होते. मात्र शिवसेनेच्या आमदारांच्या घोषणाबाजीमुळे अजित पवार आपले म्हणणे मांडू शकले नाहीत. त्यानंतर शिवसेना आमदार अनिल कदम यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल शिवसेनेची भूमिका मांडली. आज विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.