रामदेव बाबांच्या भेटीतून राज ठाकरे कोणता 'योग' जुळवून आणणार?

योगगुरू रामदेवबाबांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली, तर सकाळी 10 वाजताच्या सुमारास राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एकाच दिवशी राज्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींसोबत घेतलेल्या भेटीवर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

राज ठाकरे आणि बाबा रामदेव यांच्यात जवळ-जवळ 30-40 मिनिटे चर्चा झाली. योगाविषयी प्रामुख्याने चर्चा झाल्याचं जरी सांगितलं जात असलं, तरीही राजकारणावरही गंभीर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता बाबा रामदेव यांच्या भेटीतून मनसे कोणता 'योग' जुळवून आणणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.रामदेव यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान राज ठाकरे यांनी पुत्र अमित यांच्या व्याधीच्या अनुषंगाने रामदेव यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. उपयुक्त योगासनांची माहिती घेतली.

रामदेव बाबांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून या दोन्ही भेटींची माहिती दिली.




राज्य सरकारने रामदेवबाबा यांना विदर्भात दिलेल्या जमिनीवरुन सध्या वाद सुरू आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात खटला देखील सुरू आहे. विशेष म्हणजे या जमिनीबाबत काँग्रेसचे संजय निरुपम यांनी राज्य सरकार आणि स्वामी रामदेवबाबा यांच्यावर टीकाही केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या