बच्चू कडू यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवेसेना (Shiv Sena) मध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीला विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
विदर्भात 10 लोकसभा आणि 62 विधानसभा मतदारसंघ असल्याने हा प्रदेश राजकीयदृष्ट्या निर्णायक मानला जातो. भाजपचा प्रभाव असलेल्या या भागात आपली ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेकडून ही रणनीती आखल्याचे मानले जाते.
बच्चू कडू यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने अर्ज न भरल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Janshakti Party) स्थापन करून स्वतंत्र ओळख निर्माण केली. 2019 मध्ये त्यांच्या पक्षाने दोन विधानसभा जागा जिंकल्या होत्या आणि ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही होते.
2022 मध्ये शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. 2024 च्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी शेतकरी प्रश्नांवरील त्यांचे आंदोलन सुरूच राहिले.
दरम्यान, बच्चू कडू यांनी त्यांचा राजकीय पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची घोषणा केली आहे. प्रहार सामाजिक संघटना म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की हा निर्णय पद किंवा उमेदवारीसाठी नसून शेतकरी, दिव्यांग, कामगार आणि वंचित घटकांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी घेतला आहे.
उप मुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या कामाचे कौतुक केले, तर भाजप आमदार प्रविण तायडे (Pravin Tayade) यांनी या निर्णयावर टीका केली आहे. शिवसेनेकडून दुसऱ्या विधान परिषद जागेसाठी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा