बविआची ‘शिट्टी’ पळवली; आता ‘हाता’वर निवडणूक लढवणार

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं यावेळी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बहुजन विकास आघाडी वापरत असलेलं शिट्टी या चिन्हाची बहुजन महापक्षाच्या नावावर अधिकृत नोंदणी होती. तसंच त्यांच्या पाठिंब्यामुळे बहुजन विकास आघाडीला हे चिन्ह आपलं निवडणूक चिन्ह म्हणून वापरता येत होतं. परंतु बहुजन महापक्षानं पाठिंबा काढून घेतल्यानं ऐन निवडणूक कालावधीत बहुजन विकास आघाडीची चिंता वाढली होती. त्यामुळं आता काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर बविआ निवडणूक लढवणार आहे. 

तीन दशकांपासून वर्चस्व

वसई विरार क्षेत्रात बहुजन विकास आघाडीचं गेल्या तीन दशकांपासून अधिक कालावधीपासून वर्चस्व आहे. सुरूवातीला हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर बविआनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चष्मा हे चिन्ह निवडलं होतं. त्यानंतर पक्षाला शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आणि त्याच चिन्हावर पक्षानं एकामागोमाग एक अनेक निवडणुका जिंकल्या. 

त्यानंतर बहुजन महापक्षानं केंद्रीय स्तरावर आपल्या नावानं शिट्टी या चिन्हाची नोंदणी केली. त्यानंतर बविआ आणि बहुजन महापक्षानं सामंजस्यानं हे चिन्ह ठेवलं होतं. परंतु काही दिवसांपूर्वीच बहुजन महापक्षानं अचानक बविआचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतल्यानं ऐन निवडणुकीच्या कालावधीतच बविआ अडचणीत सापडला. परंतु आता त्यांनी ही निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच षडयंत्र

ऐन निवडणुकीच्या कालावधीत चिन्ह जाण्यामागं शिवसेनेचं षडयंत्र असल्याचा आरोप बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला. तसंच बहुजन महापक्षाचे अध्यक्ष शमशुद्दीन खान यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली आणि त्याची छायचित्र बाहेर आल्यानं यामागे त्यांचाच हात असल्याचं सिद्ध होत असल्याचंही ते म्हणाले. 

यापूर्वीही चिन्ह बदलल्यानंतर बविआ बहुमतानं जिंकून आली होती. या क्षेत्रातील नागरिक सुशिक्षित आणि सुजाण आहेत. चिन्ह बदलल्यानं ते गोंधळणार नाहीत. शिवसेना घाबरली असून याचा कोणताही फरक पडणार नसल्याचं मतही पक्षाचे संघटक सचिव आणि प्रवक्ते आजिव पाटील यांनी व्यक्त केलं. 


हेही वाचा -

सोमय्या... क्या खोया क्या पाया..!

५ वर्षांत गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत ६५ टक्क्यांनी वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या