बाळासाहेब ठाकरे स्मारक विधेयक एकमताने मंजूर

मुंबई - बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे विधेयक मांडताना शिवसेनेचे एकही मंत्री आणि आमदार विधानसभेत हजर नव्हते. दिलीप वळसे पाटील यांनी ही बाब लक्षात आणून दिली.

नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक विधानसभेत सादर केले. त्यानंतर भाजपा, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी यांनी एकमताने विधेयकाला संमती दिली. त्यानुसार महापौर बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे.

भाजपाने शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता विधेयक मांडले. हे विधेयक जर मुख्यमंत्र्यांनी मांडले असते तर बरे झाले असते, असा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला. भाजपाने आपल्या जाहिरनाम्यामध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा उल्लेख केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीच स्मारकांना विरोध केला आहे. महापौर बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्यासाठीही राज ठाकरे यांनी विरोध केला होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिन्नरमधील आमदार राजाभाऊ वाजे यांनी या विधेयकावर चर्चा करताना स्मारकाला पाठिंबा दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या