'लडकी हूँ, लड सकती हूँ' अभियान राजकारणाची दिशा बदलणार- बाळासाहेब थोरात

महिलांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी आणि त्यांना आणखी सक्षम बनविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत महिलांना आपल्यावर होणाऱ्या अत्याचाऱ्यांना विरोध कसा करायचा याचे धडे दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांनी महिला सक्षमीकरणासाठी उत्तर प्रदेशमध्ये 'लडकी हूँ, लड सकती हूँ' हे अभियान सुरू केले. याच 'लडकी हूँ, लड सकती हूँ' अभियानांतर्गत मुंबई काँग्रेसनं पिंक रन मॅरेथॉन आयोजित केली होती. तसंच, या पिंक रन मॅरेथॉनमध्ये प्रचंड महिलांनी सहभाग घेतला होता.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस महासचिव बी. एम. संदीप यांच्यासह मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई काँग्रेसच्या पिंक रन मॅरेथॉनमध्ये तब्बल ६ हजार महिलांनी सहभाग घेतला होता. १८ ते ३५, ३५ ते ५५ आणि ५५ ते पुढे अशा ३ वयोगटांमध्ये मॅरेथॉन दौड पार पडली. यातील १८ ते ३५ या वयोगटाचे विजेतेपद अलिबागच्या ऋतुजा सकपाळ यांनी पटकावले. तर दुसरे स्थान चिपळूण, रत्नागिरीच्या साक्षी पड्याळ व तिसरे स्थान डोंबिवलीच्या प्रियांका पाईकराव यांनी पटकावले. ३५ ते ५५ वयोगटात विजेतेपद अरुणा मिश्रा यांनी पटकावले. तर दुसरे स्थान आंचल मारवा आणि तिसरे स्थान क्रांती साळवी यांना मिळाले.

'लडकी हूँ, लड सकती हूँ' या अभियानामुळं देशभरातील मुलींमध्ये व महिलांमध्ये नवे चैतन्य निर्माण झालं आहे. हे अभियान केवळ निवडणुकीचे अभियान नसून, देशभरातील महिलांना ताकद देणारे अभियान आहे. शिवाय हे अभियान देशातील राजकारणाची दिशा बदलणारे असल्याचं मत महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

'लडकी हूँ, लड सकती हूँ' हे अभियान आणि घोषवाक्य केवळ भारतापुरते मर्यादित नाही तर, जगामध्ये जिथे-जिथे महिलांवर अत्याचार होत आहे, तेथील महिलांना ताकद देणारे घोषवाक्य बनले आहे, असं थोरात यांनी म्हटलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या