भारत बंदला 21 राजकीय पक्षांचा पाठिंबा

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत होत असलेल्या वाढीविरोधात काँग्रेसने सोमवारी 10 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला. दरम्यान या बंदला देशातील 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये डावे पक्ष, द्रमुकसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही याला पाठबळ दिलं आहे. तर सत्तेत सहभागी असूनही विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं या बंदकडे पाठ फिरवली आहे.

बंदची वेळ?

सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत यावेळेत हा बंद पाळण्यात येणार असून, त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी बंद शांततेत पुकारावा, असं आवाहन विरोधकांनी केलं आहे.शिवाय बंदला इतर पक्षांनीही पाठिंबा द्यावा, असं आवाहन काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेसचा दावा

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे की, सामान्य जनतेला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागू नये म्हणून 9 ते 3 अशी बंदची वेळ ठरवण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सरकारकडे केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

या 'भारत बंद'ला समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, राजद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दल सेक्युलर, नॅशनल लोकदल, झारखंड मुक्ती मोर्चा, मनसे आणि अन्य पक्षांंनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या