छगन भुजबळांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा लिलाव

मर्चंट बँकेचे 4 कोटी 34 लाख थकवल्याने पाच महिन्यांपूर्वी ताबा घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आता जाहीर लिलाव विक्री करण्यासाठी बँकने नोटीस प्रसिद्ध केली आहे. 30 नोव्हेंबरला दुपारी 1 ते 3 या वेळेत बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात हा लिलाव होणार असून भुजबळांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

कंपनीचे संचालक कोण?

माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, सत्यने केसकर हे या कंपनीचे संचालक असून त्यांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने लिलाव पद्धतीने 2009 मध्ये साखर कारखाना विकत घेतला होता. त्यांनतर तीन ते चार वर्षांनी करखान्याच्या कामाला सुरुवात झाली. साधारण चार वर्षे गाळप हंगामही या कारखान्यात चालू होता. 

भुजबळांच्या अडचणीत भर

16/ 17 ला शेवटचा हंगाम निघाला, त्यावेळी शेकडो कर्मचारी या कारखान्यात कामाला होते. परंतु, त्यांनतर कारखाना आर्थिक अडचणीत आला आणि आजपर्यंत बंद आहे. कारखान्याच्या 4 कोटी 34 लाखाच्या कर्जासाठी तारण ठेवलेल्या मालमत्ता नामको बँकेनं ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कायदेशीर बाबी प्रमाणे वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रकाशित करूनच कारवाई केल्याचं बँकेने सांगितलं होतं. कंपनीचा लिलाव होणार असल्याने भुजबळ कुटुंबियांच्या अडचणीत भर पडणार हे निश्चित.

पुढील बातमी
इतर बातम्या