राणे, केतकर, राज्यसभेवर बिनविरोध, रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज मागे

भाजपाच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ६ जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र गुरूवारी रहाटकर यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

कोण आहेत उमेदवार?

राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठी देशभरात निवडणूक होत आहे. त्यातील ६ जागा महाराष्ट्रातून आहेत. त्यानुसार २३ मार्चला राज्यसभेच्या ६ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपाकडून प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन आणि नारायण राणे शिवसेनेकडून अनिल देसाई, काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण बिनविरोध निवडून येणार आहेत.

भाजपाची खेळी

भाजपाच्या खेळीने काँग्रेसच्या गोटात चिंता आणि संभ्रम निर्माण झाला होता. भाजपाने चौथा उमेदवार रिंगणात कायम ठेवला आणि शिवसेनेने भाजपला साथ दिली, तर काँग्रेसचा उमेदवार धोक्यात येण्याची शक्यता होती. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रहाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या