“दिल्लीत कोणाचा बाप, हे २ निवडणुकांमध्ये जनतेने बघितलंय”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर “आम्ही तुमचे बाप आहोत”, अशा शब्दांत टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने चोख प्रत्त्युत्तर दिल्यानंतर जनताच आमची मायबाप आहे, असं वक्तव्य पुन्हा एकदा पाटील यांनी केलं आहे. (bjp leader chandrakant patil targets ncp over apmc and farm bill)

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं सेस गोळा करण्याच्या घोषणेनंतर चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत, तसंच यांच्या बापाची पेंड आहे का?; अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी फटकारलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनीसुद्धा चंद्रकांतदादा पाटलांवर टीकास्त्र सोडलं होतं.

चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे?

हेही वाचा - राजकीय चर्चा तर होणारच, चंद्रकांत पाटील यांनी वाढवलं ‘त्या’ भेटीमागचं गूढ

कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता. देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कमागार विधेयक आणले त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपाची ? कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्या साठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले होते.

त्यावर आता आम्ही शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेला आपले मायबाप मानतो, आज त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताच्या विधेयकांना विरोध करणाऱ्यांसोबत आम्ही सदैव लढा देऊ. दिल्लीत गेल्या ६ वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे, तुम्हीसुद्धा पाहिलंय!, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचलं आहे.

हेही वाचा - केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणं गरजेचं- उद्धव ठाकरे
पुढील बातमी
इतर बातम्या