आशिष शेलारांच्या समर्थनार्थ भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन, कार्यकर्त्यांची गर्दी

मुंबई महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्यातील वाद आता आणखीनच चिघळला जात आहे. आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता भाजपा नेते आशिष शेलार यांच्या समर्थनासाठी भाजपकडून सकाळपासून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे.

किशोरी पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात आशिष शेलार यांचा जबाब नोंदवण्यात येणार आला. या पार्श्वभूमीवर मरिनलाईन्स पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे बडे नेते दाखल झाले होते. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि इतर नेते याठिकाणी दाखल झाले होते. 

भाजपच्या अनेक नगरसेविकाही याठिकाणी जमल्या होत्या. तर आशिष शेलार यांच्या घराबाहेरही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. हे सर्व कार्यकर्ते आशिष शेलार यांच्यासोबत मरिनलाईन्स पोलीस ठाण्यापर्यंत आले होते. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड गर्दी जमली होती.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा लाड यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. महाविकासआघाडी सरकारनं दडपशाहीनं यंत्रणेचा गैरवापर करुन आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचा सन्मान म्हणून आम्ही रितसर जामीन घेणार आहोत. हा जामीनपात्र गुन्हा असल्यानं १५ मिनिटांत जामिनाची प्रक्रिया पूर्ण होईल.

राज्य सरकार आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि आमच्या इतर नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही या सगळ्याला भीक घालत नाही. भाजप संघर्ष किंवा अटकेला घाबरत नाही. आम्ही या सगळ्यासाठी तयार आहोत. एकदा आशिष शेलार यांना जामीन मिळू दे, त्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाईल. आगे आगे देखो होता है क्या, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप शिवसेनेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आशिष शेलार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ज्या सरकाराचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार उघड केला म्हणून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करुन शिवसेनेकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

वरळी दुर्घटनेतील जखमींना नायर रुग्णालयात योग्य उपचार का मिळाले नाहीत, हाच माझा सवाल आहे. या प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्यानेच जे मी बोललो नाही, ते मुद्दामू निर्माण करुन माझ्यावर खोट्या केसेस टाकण्यात आल्याचे शेलार यांनी म्हटले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या