क्रूझ ड्रग्ज पार्टीत होता भाजप नेत्याचा मेहुणा; नवाब मलिकांची माहिती, उद्या करणार नाव घोषित

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून एनसीबीने अटक केली. त्यानंतर मुंबई न्यायलयाने आर्यन खानसह ८ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेस नेते नवाब मलिक यांनी एक स्फोटक दावा केला आहे. 'क्रूझवरील ड्रग पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा होता. मात्र, त्याला सोडण्यात आलं,' असा दावा मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या या दाव्यामुळं क्रूझवर ड्रग्जप्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी लवकरच सविस्तर माहिती देणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. क्रूझ पार्टीवरील कारवाईत एनसीबीनं एकूण १० जणांना पकडलं होतं. त्यापैकी २ जणांना सोडलं. या दोघांमध्ये एक भाजप नेत्याचा मेहुणा होता. त्या दोघांना NCB कार्यालयात आणण्यात आलं होतं. मात्र, काही तासांनी त्यांना सोडण्यात आलं. हे जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आलं का, असा सवालही यावेळी नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

'भाजपचा हा नेता कोण आहे, त्याचं नाव उद्या घोषित करणार आहे. भाजपचा तो हायप्रोफाईल नेता असून त्यानंच सगळं गॉसिप केलं आहे. पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा? NCB ला याचं उत्तर द्यावंच लागेल, असं मलिक म्हणाले. NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रसादमाध्यमांशी बोलताना ८ ते १० जणांना पकडलं आहे, असं सांगितलं होतं. संपूर्ण कारवाई करणारा एक अधिकारी अशी अंदाजे माहिती कशी देऊ शकतो, असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा केला.

'परमबीरसिंग देखील जनतेचा सेवक होता. शर्मा सुद्धा जनतेचे सेवक होते, परंतु देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्ती देखील त्यातील आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार आहे. कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. २ ग्रॅम, ४ ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागानं दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या. त्यात २० किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामं आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात लागतील, तसतशी यांची पोलखोल करणार आहे, असा इशारा मलिक यांनी दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या