“हिंदूविरोधी ठाकरे सरकारची दहीहंडी उत्सवावर बंदी”, भाजप नेत्याचा संताप

कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दी न करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर गेल्या वर्षी प्रमाणेच निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. समन्वय समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरून भाजप नेत्यांकडून चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी संवाद साधला. 

दहिहंडीचा उत्सव हा अतिशय जवळून, एकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्यात येणारा सण आहे, या खेळात मानवी थर रचले जात असताना एकमेकांना जवळून स्पर्श होतो, थर लावतांना अंगावर पाणी टाकले जाते, पावसाळा सुरु आहे, पाण्याने मास्क भिजला तर मास्कची सुरक्षितता संपूर्ण संपुष्टात येते. डेल्टा प्लस हा विषाणू घातक असून तो वेगाने पसरतो. 

दहिहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती आहे. कोरोनाने आजही आपण आपले आप्तस्वकीय गमावत आहोत. हा सण आपण रक्तदान, औषधे आणि कोरोना प्रतिबंधात्मक साधनांचा पुरवठा करून साजरा करू, आपल्या उत्सवाचे “स्पीरीट” वेगळ्या पद्धतीने जपू असं आवाहन यावेळी पथकांना करण्यात आलं.

हेही वाचा- यंदाही मानाच्या हंड्या फुटणार नाहीत; राज्य सरकारनं नाकारली परवानगी

यावेळी उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचं सावट लक्षात घेऊन सामाजिक तसंच आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू अशी भावना व्यक्त केली.

त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना, उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली. या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये, असं भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

तर, दहीहंडी  होणारच..  घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत.. बार उघडता त्यांना नियम लावता आणि हिंदू सणांना विरोध ? आम्ही दहीहंडी करणारच.. असं आव्हान भाजप आमदार राम कदम यांनी सरकारला दिलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या