‘ही’ तर लोकशाहीची हत्या, राणेंच्या अटकेनंतर भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत करत 'कानाखाली वाजवण्याची' भाषा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. यानंतर भाजपकडून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.  महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचा दावा भाजपने केला. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केले, तो प्रकार म्हणजे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दबूनही जाणार नाही. हे लोकं जन-आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, आमचा प्रवास चालूच राहणार.

हेही वाचा- अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

साेबतच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्र यांनी राजधानी दिल्लीतील पक्ष कार्यालयात मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संबित पात्रा म्हणाले, केंद्रीय मंत्री राणे यांची अटक हे एक गंभीर प्रकरण असून चिंतेचा विषय आहे. एका तऱ्हेनं हे लोकशाहीचं हनन आहे... ही लोकशाहीची हत्या आहे. नारायण राणे यांनी काही शब्दांचा वापर केला जे टाळता आले असते. पण हीच का तुमची सहिष्णुता? हेच का तुमचे कायदे?' असा प्रश्नही पात्रा यांनी यावेळी विचारला.

एकिकडे महाराष्ट्रातले काही मंत्री कायदे सर्वोच्च स्थानी असल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करणं, नागरिकांचा जीव धोक्यात टाकणं हेच कायदे आहेत का? एका केंद्रीय मंत्र्यावर ३०-४० एफआयआर दाखल करणं, हे कायदे आहेत का? असं म्हणताना भाजपनं राणेंना पाठिंबा व्यक्त केला.

पुढील बातमी
इतर बातम्या