अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काहीच नाही, भाजपची टीका

महापालिका आयुक्त अकबाल सिंह चहल यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा महापालिकेचा अर्थसंकल्प (bmc budget)सादर केला आहे. या अर्थसंकल्पाचं सत्ताधारी शिवसेनेनं (shivsena) स्वागत केलं आहे. तर भाजपसह काँग्रेसनं या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

भाजपनं म्हटलं आहे की, या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काहीच नाही. मुंबईकरांना गुलाबी स्वप्न दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. हा दिवाळखोरीतील अर्थसंकल्प आहे. ऊर्दू भवन बांधणाऱ्यांना या अर्थसंकल्पात मराठी भवन आणि डबेवाला भवनाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही.

तर कचरा करणाऱ्यांकडून वापरकर्ता शुल्क आकारण्यात येण्याच्या निर्णयाला काँग्रेसनं विरोध केला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावरून येणाऱ्या काळात महापालिका स्थायी समितीत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेचे गटनेते आणि भाजप नेते प्रभाकर शिंदे म्हणाले की, अर्थसंकल्पात जकातीपोटी नुकसान भरपाई ११ हजार ४२९ कोटी गृहीत धरलेली आहे. आज पाच वर्षांनंतर ही नुकसान भरपाई महापालिकेला यापुढेही मिळणार आहे का? राज्य शासनानं तशी ग्वाही दिली आहे का? या प्रश्नाचे कुठलेही उत्तर या अर्थसंकल्पात मिळत नाही. सर्वसामान्य मुंबईकरांची या अर्थसंकल्पाकडून घोर निराशा झाली आहे. केवळ हा चुनावी जुमला संकल्प असून कधीच अंमलबजावणी न होणाऱ्या पोकळ घोषणा देण्याची परंपरा यावेळीही कायम सुरू ठेवली आहे, अशी टीका प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

आज सादर केलेला मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सूजलेला आहे. उत्पन्नात प्रत्यक्षात वाढ करण्यासाठी कुठलीही उपाययोजनांबाबत उल्लेख न करता अंतर्गत कर्ज आणि राखीव निधीतून तब्बल ६९% उचल करून विकास कामे कशी पूर्ण होणार? हा अर्थसंकल्प मुंबई पालिकेला दिवाळखोरीकडे नेणारा आहे. भांडवली विकासकामांचे कागदी घोडे नाचवणारा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात बोलाचीच कढी’ असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली.

आजचा पालिकेचा अर्थसंकल्प बोगस आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काहीच घोषणा करण्यात आलेली नाही. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

बजेटमध्ये फक्त मुंबईकरांना स्वप्न दाखवण्यात आलं आहे. त्यात नवं काही नाही. कचरा निर्मिती करणाऱ्यांना शुल्क आकारलं जाणार आहे हे चुकीचं आहे, असं सांगतानाच रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाचा बजेट कमी केला आहे. मग कोस्टल रोडला प्राधान्य का? असा सवाल काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. कोस्टल रोडला विरोध नाही, पण त्याला प्राधान्य कशाला? असा सवाल करतानाच हा बजेट मुंबईकरांच्या हिताचा नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.


हेही वाचा

महापालिकेचा अर्थसंकल्प ४५,९४९ कोटींचा, जाणून घ्या ठळक मुद्दे

पुढील बातमी
इतर बातम्या