राज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार- मुख्यमंत्री

राज्यातील चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चर्मकार आयोग स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी परळ येथील संत रोहिदास भवन भूमिपूजन आणि कोनशिलेचे उद्घाटन प्रसंगी केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, देशात संत रोहिदास यांनी समतेची परंपरा सुरू केली. त्याच माध्यमातून समाज एकत्र केला. त्यांच्या विचारातूनच ‘सबका साथ सबका विकास’ ही संकल्पना तयार झाली आहे. समताधिष्ठीत राज्याचा त्यांचा विचार होता. त्याच विचारावर शासन काम करत आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

संत रोहिदास यांच्या कार्याला आणि विचाराला समर्पित तसेच देशाला अभिमान वाटेल असं संत रोहिदास भवन येथे उभारण्यात येईल. या भवनासाठी सरकारने ११ कोटी रुपये दिले असून काही कमी पडल्यास सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिलं.

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शिवाय गटई कामगारांना प्रशिक्षिण देण्यात येऊन त्यांच्या रोजगारासाठी पुन्हा टपरी शेड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

यासाठी महानगरपालिकेने जास्तीत जास्त जागा देण्याचे निर्देशही दिले आहे. चर्मकार समाजाच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच रोहिदास समाज पंचायत संघाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्यावर शासन सकारात्मक विचार करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या