हवाई प्रवासाचा मुख्यमंत्र्यांचा वर्षाकाठी ६ कोटींचा खर्च

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासावर वर्षाकाठी सरासरी ६ कोटी रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

वैमानिक कमतरता

हेलिकॉप्टर अपघात आणि वैमानिकांच्या कमतरतेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासाच्या खर्चात वाढ झाली आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या माहितीनुसार...

२०१४-१५ या आर्थिक वर्षांत ५.३७ कोटी रुपये खर्च

२०१५-१६ या वर्षांत ५.४२ कोटी रुपये खर्च

२०१६-१७ या आर्थिक वर्षांत ७.२३ कोटी रुपये खर्च

मे २०१७ मध्ये ६.१३ कोटी रुपये खर्च

मे २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला जबर अपघात झाल्याने राज्य सरकारचं हेलिकॉप्टर पूर्णपणे नादुरूस्त झालं. त्यामुळे राज्य सरकारला त्या तारखेपासून हेलिकॉप्टर भाड्याने घ्यावं लागत आहे. त्यामुळे ६.१३ कोटी रुपये हे हेलिकॉप्टर भाड्यापोटी खर्च झाले आहेत. राज्य सरकारचं स्वत:चं विमानसुद्धा आहे. परंतु, त्यांचे वैमानिक नोकरी सोडून गेल्यामुळे सुमारे वर्षभराहून अधिक काळ ते विमानसुद्धा उड्डाणास उपलब्ध नव्हते. त्यामुळे कधी कंत्राटी वैमानिकांवर तर कधी विमान भाड्याने घेण्यावर सुमारे १३.२४ कोटी रुपये राज्य सरकारला खर्च करावा लागला आहे.

विदेशी वैमानिकांची सेवा घेणार

वारंवार वैमानिक नोकरी सोडून जात असल्याने अखेर राज्य सरकारला विदेशी वैमानिकांची सेवा घेण्याची प्रक्रिया करावी लागली आणि त्यासाठी नियामक आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करावी लागली.

जागतिक निविदा मागवल्या

नवीन हेलिकॉप्टर खरेदीची प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. जागतिक निविदा मागवण्यात आल्या आणि या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शता राखण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली.

त्यात भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, भारतीय विमानतळ प्राधीकरणच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. या नवीन खरेदीसंदर्भातील शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या