आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजातील मान्यवरांसोबत गुरुवारी सह्याद्रीवर बैठक बोलावली. मात्र मराठा समाजाने आरक्षणासाठी 58 वेळा मोर्चा काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळाल्या नाहीत, तर या बैठकीला जाऊन उपयोग काय, असं म्हणत कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला.

बैठकीला 'यांची' उपस्थिती

'सह्याद्री' अतिथीगृहावर होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, उद्योजक भैरवनाथ ठोमरे, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, सुवर्ण कोकण संस्थेचे डॉ. सतीश परब यांनी उपस्थिती लावली.

तर मंत्रालयाला घेराव

मराठा आरक्षण आंदोलनाला 16 दिवस उलटून देखील सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील रणनिती ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील मान्यवरांसोबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली. 

दरम्यान 9 ऑगस्ट पर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी दिला आहे.

'मग काय उपयोग?'

या बैठकीसाठी छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव या तिघांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र 58 वेळा मोर्चा काढूनही सरकारला मराठा समाजाच्या भावना समजल्या नाहीत. मग आता या चर्चेचा काय उपयोग, असं म्हणत त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला.


हेही वाचा - 

मराठा आरक्षण : अहवाल येताच विशेष अधिवेशन बोलवणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर जेलभरो

पुढील बातमी
इतर बातम्या