मराठा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांची 'पंढरपूर वारी' रद्द!

मराठ्यांच्या मागण्यांबाबत लेखी निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात आषाढी एकादशीला महापूजा करू देणार नाही,' असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं म्हणत पंढरपूरला न जाण्याचा निर्णय रविवारी घेतला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मी साडेबार कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून पंढरपुरातील महापुजेत सहभागी होतो. परंतु मी या पुजेत सहभागी होऊ नये म्हणून काही मराठा आंदोलक प्रयत्नशील आहेत. या विरोधामुळे पंढरपूरला येणाऱ्या १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. इथं हिंसाचाराचा कट होण्याची देखील शक्यता आहे. मला तर झेड प्लस सुरक्षा आहे, परंतु जर वारकऱ्याला जीवाला काही झालं, तर महाराष्ट्र ही घटना कधीही माफ करणार नाही, त्यामुळेच मी यावर्षी महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ते मावळे नाहीच...

माझ्या घरी विठ्ठलाची मूर्ती असून मी या मूर्तीची पूजा करेन, पण त्यासाठी वारकऱ्यांना वेठीस धरलेलं मला चालणार नाही. मराठा मोर्चाला आरक्षण देणं हे आता सरकारच्या नाही तर न्यायालयाच्या हातात आहे. ही गोष्ट ज्यांच्या लक्षात येत नाही ते फक्त राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कसा कट आखणारे महाराष्ट्राचे मावळे असू शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

कधी दिला होता इशारा?

मंगळवारी पुण्‍यात मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्‍यस्‍तरीय बैठकीत मराठा आरक्षणासंबंधी निर्णय होत नाही तोपर्यंत मुख्‍यमंत्र्यांना पंढरपुरमध्‍ये आषाढी एकादशीची पुजा करू द्यायची नाही, असा निर्णय घेण्‍यात आला होता. आरक्षणासाठी लाखोंच्‍या संख्‍येने समाज रस्‍त्‍यावर आला, तरी देखील राज्‍य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, यावेळी सरकारवर करण्‍यात आला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या