महागाईविरोधात काँग्रेसचा ७ एप्रिलला मोर्चा

केंद्र सरकारकडून (Central Government) केल्या जात असलेल्या कृत्रिम महागाईविरोधात (Inflation) काँग्रेसनं ३१ मार्चपासून आंदोलनाचा सप्ताह सुरू केला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ७ तारखेला मुंबईत मोर्चा काढून महागाईविरोधात आवाज उठवला जाणार आहे’, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

केंद्रातील भाजपा सरकार दररोज इंधन दरवाढ करत आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल, जिवनावश्यक वस्तुंचे दर सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या महागाईविरोधात जनतेत तीव्र असंतोष आहे.

काँग्रेसकडून ३१ मार्चपासून देशभर विविध पद्धतीनं आंदोलन केलं जात आहे, राज्यातही आंदोलन करुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाची समाप्ती ७ तारखेच्या मोर्चानं होईल. ७ तारखेला गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी सहभागी होतील.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पटोले म्हणाले, भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने चिडीचा खेळ खेळत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला आहे.

मशिदीसमोर समोर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणे हा प्रकार राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आहे. संविधानाने सर्वधर्म समभावाचे सूत्र दिले आहे. सर्व धर्मांना समान अधिकार दिलेले आहेत परंतु जे लोक संविधानच मानत नाहीत ते असे प्रयत्न करुन मुख्य विषयापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


हेही वाचा

राज ठाकरेंच्या भोंग्या संदर्भातील वक्तव्यानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

"असत्यमेव जयते..." ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं ट्विट

पुढील बातमी
इतर बातम्या