आंबेडकर स्मारकाच्या निविदा प्रक्रियेचा मुहूर्त चुकला

14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती जगभर साजरी केली जाणार आहे. आंबेडकरांच्या जयंतीआधी वा जयंतीदिनी आंबेडकर स्मारकाच्या बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढण्यात येणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया लांबल्याने आंबेडकर जयंतीची डेडलाईन अखेर चुकली आहे. 

आता येत्या आठ ते पंधरा दिवसांत निविदा काढण्यात येतील, अशी माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. दादर, चैत्यभूमी येथील इंदू मिलच्या 12 एकर जागेवर डॉ. आंबेडकरांचे भव्यदिव्य स्मारक एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. 500 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणाऱ्या या स्मारकात डॉ. आंबेडकरांचा 350 फुटांचा पुतळाही साकारण्यात येणार आहे. 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकासाठीच्या डिझाईनसाठी एमएमआरडीएने वास्तूशास्त्रज्ञांची स्पर्धा घेतली होती. त्यातून वास्तूशास्त्रज्ञ शशी प्रभू यांचे डिझाईन निवडण्यात आले आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) कडून स्मारकासाठीची इंदु मिलची जागा सरकारकडे हस्तांतरित न झाल्याने स्मारकाच्या बांधकामासाठी निविदा मागवत स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यासाठी विलंब होत असल्याचे चित्र होते. दरम्यान, याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे.

स्मारकाचे काम मार्गी लावण्यातील जमीन हस्तांतरणाचा अडसर नुकताच दूर झाला आहे. एनटीसीकडून 25 मार्च रोजी इंदू मिलची जमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे एमएमआरडीएने आता निविदा प्रक्रियेला वेग दिलाय खरा, पण तांत्रिक अडचणींमुळे आंबेडकर जयंतीदिनी निविदा निघणार नसून, एप्रिलच्या तिसऱ्या वा शेवटच्या आठवड्यात निविदा काढण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात येणार असून, निविदा सादर करण्यासाठी कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर निविदेची छाननी आणि निविदा अंतिम करत बांधकामाचे कंत्राट दिले जाईल आणि मग प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यानुसार आंबेडकर स्मारकाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू व्हायला आणखी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या