corona outbreak: मध्यरात्रीपासून मुंबई-पुण्यातील सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा बंद- मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढून १७ वर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड येथील व्यायामशाळा, सिनेमागृह, जलतरण तलाव, नाट्यगृह शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विधानसभेत केली. त्याचसोबत नागरिकांनी विनाकारण रेल्वे, बस प्रवास करू नये, मॉलमध्येही जाणं टाळावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा नियमित सुरू राहणार आहेत. त्या वगळता पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील शाळा बंद राहतील, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. 

कर्नाटकसह दिल्ली, हरयाणा, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आणि ओडिशातील राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा कॉलेज, मॉल्स आणि सिनेमागृह, पब, लग्नसोहळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाण्यातील व्यायामाशाळा, जलतरण तलाव, सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोनामुळे जवळपास निम्मा भारत बंद झाल्याची स्थिती झाली आहे.

देशभरात आतापर्यंत ८७ जणांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन भारताने स्वत: ला जगापासून अलग केलं आहे. भारतात जगभरातून येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसाही १५ एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. जगभरात कोरोना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या