रूग्णांना मृत्यूनंतर तरी सन्मानजनक वागणूक मिळावी- शालिनी ठाकरे

कोरोनाशी मुकाबला करताना केंद्र, राज्य सरकार आणि प्रशासन अथक प्रयत्न करत असले, तरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शिवाय कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही वाढतोच आहे. एका बाजूला सर्वसामान्य रुग्णांनाही खासगी रुग्णालयांत नाकारलं जात असताना, कोरोनाबाधितांची मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अशा रुग्णांना मृत्यूनंतर तरी सन्मानजनक वागणूक मिळावी, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे. 

काय आहे पत्रात?

शालिनी ठाकरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी मुंबई तसंच नवी मुंबईत घडलेल्या तीन घटनांची उदाहरणे दिली आहेत. ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात, १९ एप्रिलला मुंबईतील केईएम रुग्णालयातील कोविड-१९ कक्षात मृत्यू झालेल्या १० जणांचे मृतदेह ठेवायला शवागरात जागा नव्हती. त्यामुळे हे मृतदेह २० क्रमांकाच्या कोविड-१९ कक्षातच ठेवण्यात आले. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी ५ मृतदेहांसाठी विशेष किटची सोय करण्यात आली, तर ५ मृतदेह घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात येणाऱ्या पिशव्यांनी सीलबंद करण्यात आले. 

दुसऱ्या घटनेत कूपर रुग्णालयात २ कोरोना संशयितांचा २२ एप्रिलला मृत्यू झाला. हे मृतदेह कोविड कक्षात १२ तास पडून होते, कारण त्यांच्याजवळ जायलाही कुणी धजावत नव्हतं. तिसरी घटना नवी मुंबईतील आहे. एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला. परंतु खासगी रुग्णालयाने त्यांना दाखल करून न घेतल्याने १८ एप्रिलला वाशी महापालिका रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं. तिथंच त्यांचा मृत्यू झाला. पण कोरोनाची चाचणी करून मृतदेह नातेवाईकांना देण्यास ३ दिवस लागले. 

कठोर कारवाई करा

अशा सर्व परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचार नाकारुन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या खासगी रुग्णालयावर कठोर कारवाई करावी, कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यास, तो रुग्ण कोरोनाबाधित होता की नाही, याबाबत केली जाणारी वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर करून एका विशिष्ट कालावधीत मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचे आदेश द्यावेत, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह सीलबंद करण्यासाठी आवश्यक सामग्री सर्व संबंधित रुग्णालयात तात्काळ उपलब्ध करून द्यावी, राज्य सरकार किंवा महापालिकेच्या रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नसल्यास त्यांची अग्रक्रमाने भरती करावी तसंच मृतदेहांना सीलबंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानसोपचार तज्ज्ञाच्या माध्यमातून समुपदेशन करावं, अशा मागण्या शालिनी ठाकरे यांनी सरकारकडे केल्या आहेत.   

पुढील बातमी
इतर बातम्या