खतरनाक! मुंबई, पुण्यात १८ मेपर्यंत वाढू शकतो लाॅकडाऊन

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून देशभरात ३ मे पर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा देशव्यापी लाॅकडाऊन ४ मे रोजी काढून घेण्यात आला, तरी महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात मात्र लाॅकडाऊन १८ मेपर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढू शकतो, असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवला आहे. 'लाइव्ह मिंट' या वृत्तसंस्थेशी बोलताना टोपे यांनी ही शक्यता वर्तवली आहे. तसं झाल्यास मुंबई, पुणेकरांना आणखी १५ दिवस घरात थांबावं लागू शकतं.

कंटेन्मेंट झोनपर्यंत मर्यादित?

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ६८१९ च्या पुढं गेली असून त्यात मुंबईतील ४४४७ आणि पुण्यातील ९६१ हून अधिक रुग्णांचा समावेश आहे.  गेल्या महिन्याभरात मुंबई-पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. त्याकडे पाहता भलेही ४ मे नंतर देशातील लाॅकडाऊन मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, तरी कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या मुंबई, पुण्यातील लाॅकडाऊन १८ मे पर्यंत सुरूच ठेवावं लागू शकतं.  कदाचित या लाॅकडाऊनची मर्यादा मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनपुरतीच असू शकते, अशी शक्यताही टोपे यांनी वर्तवली आहे.

कार्यक्रमांवर बंदी कायम

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लाॅकडाऊन लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे संसर्ग थांबत नसेल, तर नाईलाजाने लाॅकडाऊन वाढवावाच लागू शकतो. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या वाढणारे रुग्ण चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. यातील प्रत्येक कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध पाळले जातात की नाही यावर कडक लक्ष ठेवावं लागणार आहे. ३ मेनंतर मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात पुढील १५ दिवस तरी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही सेवा सुरू करण्यास परवानगी नसेल.

आम्ही ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये कारखाने आणि कृषीविषयक कामे सुरू करण्यासाठी अंशत: परवानगी दिली असली, तरी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे-समारंभांवर १८ मेपर्यंत बंदी कायम ठेवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, असंही ते म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या