मनसेच्या माजी आमदाराची कोरोनाग्रस्तांना १० लाखांची मदत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई (mns leader nitin sardesai) यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द केला. प्रत्येकाने आपल्या आर्थिक कुवतीनुसार कोरोनाग्रस्तांसाठी जमेल तशी मदत करून खारीचा वाटा उचलावा असं आवाहन देखील सरदेसाई यांनी केलं आहे. 

कोरोना (covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने राज्यातील जनतेची मदत करा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी मनसे सैनिकांना केलं आहे. त्यानुसार मनसेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जात आहे. सरकारी रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एक-एक मास्क ३ ते ४ दिवस वापरावं लागत आहे; हे समजताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: या कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी १० हजार मास्क डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द केले.

कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाबाधितांची वाढलेली संख्या पाहता परिसरात कोरोना टेस्टींग लॅब उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शर्मिला राज ठाकरे यांनी पक्षाच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या मार्फत मुंबईतील सरकारी रुग्णालयांत २५०० चादरींचं वाटप केलं. महाराष्ट्र सैनिकांनी आपापल्या भागातील सरकारी रुग्णालयांत या चादरी नेऊन पोहचवण्याचं काम केलं.

तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक येथील नगरसेवकांनी आपलं एप्रिल महिन्याचं संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशा तऱ्हेने मनसेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे कोरोनाग्रस्तांसाठी पुढाकार घेतला जात आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या