प्रचारादरम्यान नगरसेवकांची प्रकृती बिघडली

भांडुप गाव - मागील महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या भांडुपमधील मंगेश पवार यांच्या पत्नी सध्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. परंतु प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच मंगेश पवार यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना त्वरित वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

महापालिकेच्या भांडुपमधील प्रभाग क्रमांग़ 111 मधून भाजपाच्यावतीने भाजपा पुरस्कृत अपक्ष नगरसेवक मंगेश पवार यांची पत्नी सारिका पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महापालिका गटनेते धनंजय पिसाळ यांची पत्नी आणि माजी नगरसेविका भारती पिसाळ, सेनेच्यावतीने संजीवनी तुपे यांना उमेदवारी दिली आहे. या भागात एकमेव पवार वगळता सर्व उमेदवार हे कांजूरमार्ग भागातील आहेत. दरम्यान, गुरुवारी पवार हे पत्नीच्या प्रचारफेरीत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती ठीक असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

शिवसेनेचा प्रचार अखंड पारायणातून

या प्रभागात अखंड पारायण संपन्न झाले असून या पारायणाला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवारांनी हजेरी लावली होती. परंतु या पारायणात किर्तनकाराने थेट शिवसेनेचा उल्लेख करत शिवसेनेलाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार तिथून निघून गेले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रभागात विद्यमान नगरसेवक मंगेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून शिवसेनेचे विश्वास तुपे यांनी आपल्या बायकोच्या प्रचारात बाजी मारल्यामुळे या दोन्ही विद्यमान नगरसेवकांची हवाच गेल्याची चर्चा विभागात ऐकायला मिळत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या