काँग्रेसला झटका, आंबेरकर शिवसेनेत दाखल

दादर - मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाचे सुरूंग आता फुटू लागलेत. पक्षातील शह काटशहाच्या राजकारणात आता अनेकांचे पत्ते कापले जात आहेत. त्यामुळे अंतर्गत राजकारणाच्या या उकाळयांमध्ये होरपळून निघणाऱ्या पक्षाच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना आता बाहेरचा रस्ता धरावा लागत आहे. तब्बल दोन दशके काँग्रेसची सेवा केल्यानंतर तिसऱ्यांदा नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी या अंतर्गत वादाला कंटाळून पक्षाला राम राम केला आणि शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेता म्हणून सुमारे 3 वर्षे आंबेरकरांनी काम पाहिले. मार्च 2007 पासून ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आता नव्या प्रभाग रचनेत त्यांचा प्रभाग बदलला. त्यामुळे यापूर्वी प्रतिनिधित्व केलेल्या प्रभागाचा समावेश असलेला प्रभाग 68 मधून ते तिसऱ्यांदा लढण्यास तयार होते.

आंबेरकर हे गुरुदास कामत गटाचे समर्थक मानले जातात. कामत आणि निरुपम गटात सध्या प्रचंड वाद सुरू आहेत. त्यातच स्थानिक माजी आमदार बलदेव खोसा यांनी आपल्या मुलाला आणि स्वीय सहायकला तिकीट देण्यासाठी 100 टक्के निवडून येणाऱ्या जागेतून आंबेरकर यांचा पत्ता कापण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस पक्षात आता मराठी माणसांना स्थान नसून निरुपम आपल्या जवळच्यांचे हट्ट पुरवण्यासाठी विद्यमान नगसेवकांचे पत्ते कापत आहेत.

"मी अंधेरी पश्चिम भागातून निवडून येत असताना, मला मालाड, दिंडोशी भागातून निवडणूक लढवण्यास सांगून एकप्रकारे माझा पत्ता साफ करण्याचा प्रयत्न सुरु होता. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा हा एकमेव शिवसेना पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी असायचे आणि शिवसेनेचे हे नेतृव बुलंद करण्याची ताकद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केला," असे आंबेरकर यांनी या वेळी बोलताना सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या