सत्तेसाठी किती लाचारी? सावरकर वादावरून फडणवीसांची शिवसेनेवर टीका

सत्तेसाठी किची लाचारी करायची, कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता जाेरदार टीका केली. 

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत त्यांच्या चहापानाला आम्ही जाऊ शकत नाही. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या विधानावर निषेधाचा प्रस्तावही अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. 

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून सावरकर यांच्याबद्दल आपली भूमिका मांडली आहे. आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. तसंच नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

 या वादाचं कारण म्हणजे, काँग्रेसकडून रामलीला मैदानावर 'भारत बचाव' रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत,  'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच देशाची माफी मागावी, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला होता. त्यावरून भाजपने राहुल गांधी यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या