धर्मा पाटलांच्या कुटुंबाला दिलासा, ५४ लाखांचा मिळणार मोबदला!

मंत्रालय परिसरात विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना अखेर दिलासा मिळाला आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे. त्यानुसार धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना ५४ लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे.

५ एकरसाठी ५४ लाख

या अहवालात पाटील यांच्या ५ एकर जमिनीसाठी ५४ लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस करण्यात आली. यापूर्वीचा पंचनामा रद्द करून रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरला जाईल.

वाढीव मोबदला

मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे धर्मा पाटील यांच्या नावे २८ लाख ५ हजार ९८४ रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना २६ लाख ४२ हजार १४८ रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर १२ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. अखेर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने न्यायाची मागणी केल्यावर फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली.

पुढील बातमी
इतर बातम्या