मंत्रालयातील 'त्या' शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न?

मुंबई - मंत्रालयात गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातून आलेल्या रामेश्वर भुसारे या शेतकऱ्याला पोलिसांनी मारहाण केली, असा दावा शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी केला होता. मात्र या शेतकऱ्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शेतकऱ्याला भेटण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते मरिन लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी रामेश्वर भुसारेबद्दल विचारणा केली असता पोलीस अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तर देत शेतकऱ्याला न्यायालयात घेऊन गेले आहेत असे उत्तर दिले. मात्र या उत्तरावर अजित पवार यांचे समाधान झाले नाही. 

अजित पवार यांनी थेट शेतकऱ्याला फोन लावला. शेतकऱ्याने सांगिलते की, मला पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. हे उत्तर ऐकताच अजित पवार यांचा पारा चढला. अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्याला धारेवर धरत विरोधी पक्ष नेते असताना पोलीस अधिकारी खोटे बोलत आहेत. अशा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करायला पाहिजे असे सुनावले. 

त्यानंतर शेतकरी रामेश्वर भुसारेंना अजित पवार यांच्या समोर आणले गेले. त्यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी रामेश्वर भुसारे यांची विचारपूस केली. मी आत्महत्येचा प्रयत्न केलेला नसून, उलटपक्षी मंत्रालयात मारहाण झाल्यानंतर पोलिसांच्या वाहनातून पोलीस ठाण्यात आणले जात असताना गळ्यातील गमचा दोन्ही बाजूंनी ओढून माझाच गळा आवळण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती शेतकरी रामेश्वर भुसारी यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिली. त्यामुळे सर्व नेते कमालीचे संतप्त झाले. मदतीची अपेक्षा घेऊन मुंबईला येणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? अशी विचारणा अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना केली.

शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी चौकशीचे आदेश - मुख्यमंत्री

शेतकरी मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्याने पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे माध्यमांना सांगितले आहे. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. मंत्रालयातील सुरक्षारक्षकांना त्याने चावा घेतल्याने त्यांना इजा झाली आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी करून संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या