'त्या' प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता आणखी चिघळत चालला आहे. वरळी इथं घडलेल्या सिलिंडर स्फोटाच्या घटनेनंतर आशीष शेलार यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. याप्रकरणी आता आशिष शेलार यांच्या विरुद्ध मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर आता वरळी सिलिंडर स्फोटानंतर सुरू झालेला महापौर किशोरी पडणेकर आणि शेलार यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वरळी सिलेंडर स्फोटा प्रकरणी आशिष शेलार यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. याचीच तक्रार त्यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात केली आहे.

या तक्रारीवरून भादंवि ३५४ (विनयभंग) आणि ५०९ (स्त्री मनास लज्जा होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी) या कलमांअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांची पोलिसात तक्रार केली असताना दुसरीकडे आशीष शेलार यांनी पेडणेकर यांनी केलेली तक्रार पडताळून पाहण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रच लिहिले आहे.

माझ्यावर आरोप करताना वस्तुस्थितीत काही फेरफार करण्यात आल्याचे सांगत शेलार यांनी निषेध केला आहे. तर, सत्ताधारी पक्षाच्या घटकांकडून माझ्यावर खोटी तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे.

वरळी येथील सिलिंडर स्फोटानंतर जखमी झालेल्यांवर उपचार करताना नायर रुग्णालयात हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप आशीष शेलार यांनी केला होता. हा आरोप करताना त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला होता.

या दुर्घटनेत एका चिमुकल्या बाळाचा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर शेलार संतापले होते. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनांनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जातात, मात्र तेथे सुरक्षितता नाही.

रुग्णांना वेळेवर उपचार देत नाहीत. मुंबईच्या महापौर तर घटनेनंतर ७२ तासांनी तेथे जातात. ७२ तास कुठे निजला होतात?, असा सवाल त्यांनी केला होता. शेलार यांच्या याच वक्तव्यावर महापौरांनी आक्षेप नोंदवला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या