म्हस्के म्हणाले की, कोणतीही अधिकृत माहिती नसताना संजय राऊत असे वक्तव्य करत आहेत, जणू त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आधीच माहिती आहे.
त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात शिवसेना ही एकच पक्ष असल्याचे स्पष्ट नमूद केले होते आणि पक्षात कोणतीही फूट पडलेली नसल्याचे मान्य केले होते. याच आधारावर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्यात आले. त्यामुळे संजय राऊत यांनी आधी निवडणूक आयोगाचा निर्णय अभ्यासावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
म्हस्के यांनी आरोप केला की, सत्तेसाठी उबाठा गटाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि तत्त्वांशी तडजोड केली. न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला तर न्यायव्यवस्थेचे कौतुक करायचे आणि विरोधात आला तर न्यायालय व न्यायाधीशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, अशी भूमिका उबाठा गटाची असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचा विश्वास बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर आहे. उबाठा गटात उरलेल्या नेत्यांना एकत्र ठेवण्यासाठीच संजय राऊत सातत्याने वादग्रस्त विधाने करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
म्हस्के यांनी टोला लगावत, "आधी उबाठा सांभाळा, मग एकनाथ शिंदेंवर बोला," असे म्हटले. तसेच उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी करत असल्याचाही दावा त्यांनी केला.
याशिवाय, इतर पक्षांमध्ये विलीन होण्याचा सल्ला देणारा उद्धव ठाकरे गट भविष्यात स्वतःच काँग्रेस, एआयएमआयएम किंवा समाजवादी पक्षात जाण्याची वेळ येऊ शकते, असा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत यांनी शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा आपल्या गटातील उरलेले आमदार, खासदार आणि नगरसेवक पक्षात टिकून राहतील याची काळजी घ्यावी, असेही म्हस्के म्हणाले. तसेच भविष्यात पुन्हा राज्यसभा किंवा लोकसभेत जाण्यासाठी संजय राऊत वेळ आल्यावर काँग्रेसमध्येही प्रवेश करू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा