काँग्रेसी नेत्यांची घरवापसी .... !

जनतेचा सरकारवरील विश्वास डळमळत असल्याने काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या घरवापसीला सुरुवात झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा सगृही येणं पसंत केलं आहे.

कोणकोणत्या नेत्यांची घरवापसी?

काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेले माजी आमदार वीरेंद्र बक्षी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज दुबे, आणि रमेश पारीख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपाला जय महाराष्ट्र करून गुरुवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि प्रवक्ते चरणसिंग सपरा यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हा घरवापसीचा कार्यक्रम पार पडला.

बांधकाम व्यावसायिक राजा मिराणी हे देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांचे समर्थकही मुंबई कार्यालयात पोहोचले, पण कार्यक्रम होईपर्यंत राजा मिराणी पोहोचले नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं. वरील नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या वोटबँकेवर मोठा परिणाम होणार आहे.

काँग्रेसला पुन्हा उभारी

गेल्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे भाजपा नेते आणि स्थानिक आमदार प्रकाश मेहता यांच्यावर विश्वास ठेवून वरील नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. पण स्थानिक तसेच राज्यपातळीवरील नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे जनतेची कामे होत नसल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. तर संजय निरुपम यांनी लोकांचा भाजपा आणि मोदींवरील विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाला उभारी मिळेल, असं मत व्यक्त केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या