‘तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात…’; होळीच्या नियमांवरून भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबईसह राज्यभरात गुरूवारी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहानं होळीची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र यंदाची होळी सरकारच्या नियमांच्या अंतर्गत साजरी करावी लागणार आहे. कोरोना आणि दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, सरकारच्या या नियमावलीला भाजपानं धुडकावून लावलं आहे.

‘तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच’, असे भाजपने स्पष्ट केले आहे. होळी आणि धुलिवंदन साजरे करण्यासंदर्भात राज्य सरकारने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यामुळं विरोधी पक्ष भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. तसंच दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी डीजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने मार्गदर्शक नियमावलीत केली आहे.

राज्यातील सर्व पोलीस स्टेशनना ही नियमावली पाठवण्यात आली असून, या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात राम कदम यांनी ट्विट करत होळी जल्लोषात साजरी करणार असल्याचे म्हटले आहे.

‘महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत.. आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच’, असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून, विरोधी पक्षाने विरोध करु नये. विरोधासाठी विरोध करत लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास ते तयार नाहीत. सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकतं, पण ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावं हे चुकीचे आहे. इतके क्रूर पद्धतीचे, अमानुष राजकाराण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हते आणि करु नये, या शब्दांत पलटवार केला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या