वाघापेक्षा मला गरुडझेप आवडते - राज ठाकरे

दादर - ठाकरे कुटुंब म्हणजे वाघ. आक्रमक होत डरकाळ्या फोडणे ही वाघाची खासियतच. परंतु या वाघापेक्षा आपल्याला गरुडझेप घेणे आवडते. 'बर्ड आय व्यू'ने आकाशातून वरून पाहणे मला आवडते. हे रहस्य उलगडले आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई लाइव्हच्या 'उंगली उठाओ' कार्यक्रमात. 'उंगली उठाओ' कार्यक्रमातील मुलाखतीत राज ठाकरेंसोबत दिलखुलास गप्पा रंगल्या.

"गरुड झेप घेण्याची भूमिका मांडताना काय काम केले पाहिजे याचाच विचार आपण करतो," असे राज ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच "2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे पक्ष हा सर्व पक्षांच्या क्रमवारीत टॉपला असेल," असेही त्यांनी भाकीत केले आहे.

"जे गेले ते फेरीवाले"

मनसे पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, जे गेलेत ते सर्व फेरीवाले आहेत. कधी या फुटपाथवर तर कधी त्या फुटपाथवर असे त्याचे धंदे चालत असतात. जे गेलेत ते एकटे गेले आहेत. पक्ष आहे तिथेच आहे. भाजपाने थैल्या सोडल्या त्यात ते घरंगळत गेले. पैशासाठी ते भाजपात गेले, असे त्यांनी सांगितले.

"प्रत्येक पक्षात चढ उतार येतो"

मनसे पक्ष संपला असे म्हटले जाते. पण कोणताही पक्ष हा कधीच संपत नसतो. 49 वर्षाच्या काँग्रेसची अवस्था जिथे वाईट झाली तिथे 10 वर्षाच्या मनसेचं काय बोलता, असा उलट सवालच राज ठाकरे यांनी केला. 2014 पूर्वी भाजपा कुठे होती? त्यांना नरेंद्र मोदींनी सावरले. परंतु या पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नाहीत. प्रत्येक पक्षात चढ उतार येत असतात. समुद्राला कायम भरती नसते, भरती नंतर ओहोटी येतच असते. त्यावेळी भरतीच्या वेळी समुद्रात गेलेल्या या करवंट्या ओहोटीला किनाऱ्यावरच राहतात असे त्यांनी सांगितले.

"कुठे आहे कॅशलेस कारभार?"

नोटाबंदीची चणचण सर्वांनाच जाणवत आहे. मग भाजपाकडे पैसा आला कुठून? कुठे आहे कॅशलेस कारभार. थापा मारून हे सत्तेवर आले आहेत आणि आता थापा मारुनच पुन्हा निवडणूक लढवत आहेत. यांनी 25 वर्षात काहीही केलेले नाही. काय केले ते ते सांगत नाहीत. मात्र, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात काय केले हे जनतेपुढे मांडत आहोत. त्यामुळे मी केलेली कामे दाखवत आहे. त्यामुळे सुशिक्षितच नव्हे तर सुज्ञ मतदार कोणाला कौल देतो ते पाहू, असे राज ठाकरे म्हणाले.

"देवेंद्र हे बसवलेले मुख्यमंत्री"

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासह भाजपाच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. याचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले, हे म्हणे 'हा माझा शब्द आहे.' यांचा कसला आला शब्द? हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत. उद्या मोदींच्या मनात आले तर त्यांचीही उचलबांगडी करून दुसऱ्याला बसवतील.

"शिवसेनेची हिंमत नाही सत्तेतून बाहेर पडण्याची"

अपमान सहन करत आणि लाथा खात सत्तेत राहणे शिवसेनेला पसंत आहे. सत्तेतून बाहेर पडण्याची शिवसेनेची हिंमत नाही. जर सत्तेतून बाहेर पडायचे आहे तर 23 तारखेचा मुहूर्त कशाला? पण यांना लाचारी पत्करायची सवय झाली आहे. दोन्ही पक्षांनी 25 वर्षात काहीही केलेले नाही. म्हणून या निवडणुकीत लोकांचे विकास कामांवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा पर्याय असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

"अमितची इच्छा असेल तरच..."

अमितला राजकारणात मुद्दाम दामटणार नाही. त्याची जर इच्छा असेल तर तो येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या