नेते, कार्यकर्त्यांच्या हट्टापुढे शरद पवारांची माघार, राजीनामा मागे घेतल्याची घोषणा

शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. वाय बी चव्हाण प्रतिष्ठाण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. 

'लोक माझे सांगाती' हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वासाने मी भारावून गेलोय. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपल्या सर्वांनी केलेली आवाहने तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतलेला निर्णय जो माझ्यापर्यंत पोहोचवला गेला, या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी इच्छा होती. परंतु मी घेतलेल्या निर्णयाची जनमाणसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी, माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा, माझे हितचिंतक, निस्वार्थी प्रेम करणारे कार्यकर्ते, अससंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमताने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केलं. देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असं सांगतच ज्येष्ठ शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.

पुढील बातमी
इतर बातम्या