मलाही पूर्णत: सावरकर कळले नाहीत - उद्धव ठाकरे

मी आतापर्यंत तिसऱ्यांदा सावरकर संमेलनाला उपस्थित राहिलो पण मलाही पूर्णत: सावरकर समजले नाहीत, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात केले. ठाण्यात 29 व्या स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोपाला उद्धव ठाकरे उपस्थित होते. सावरकर महाराष्ट्रात जन्माला आले, हे आपलं भाग्य आहे असं वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. सावरकरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे. पारतंत्र्याच्या अंधारातही सावरकरांसारखा सूर्य जन्माला आला होता, हे आपलं भाग्य आहे. अंदमानात त्यांनी जे भोगले, त्याची माहिती आजच्या पिढीला होणे गरजेचं आहे. त्याकरता तेथील जेलची प्रतिकृती मुंबईत उभारणे गरजेचं आहे. जन्मठेपेच्या शिक्षेत सावरकरांनी काय भोगले हे आजच्या पिढीला समजेल त्यावेळी त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळेल असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सावरकरांच्या विचारांची क्रांती आधी मनात पेटवणे गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोघांमध्ये मला साम्य वाटते. दोघांनीही नेहमीच अखंड हिंदुस्थानाचा नारा दिला होता. सावरकरांचे विचार आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाबाबतचे विचार सारखे होते. सावरकरांनी वयाच्या 15 व्या वर्षी स्वातंत्र्याची शपथ घेतली होती. सावरकरांना भारतरत्न देणे हा केवळ त्यांचा सन्मान नसून, आपल्या देशाचा बहुमान आहे. त्यांना हा पुरस्कार दिल्याने संपूर्ण जगाला माहिती होईल कि, आपल्या भूमीत काय रत्न जन्माला आलं होतं. त्यातही आता आपलं सरकार आहे त्यामुळे कसली वाट बघता? त्याकरता सर्व पक्षांतील सावरकरप्रेमींनी एकत्र येऊन ही मागणी जोर लावून धरली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं. जर सावरकरांना स्वीकारायचं असेल तर सर्व अर्थाने स्वीकारलं पाहिजे असंही उद्धव ठाकरे भाषणाच्या शेवटी म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या