तुकाराम मुंढे नाशिकमधून मुंबईत

कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकारी, अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांना अखेर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून पायउतार करण्यात आलं आहे. मुंढे यांची बदली थेट मुंबईत, मंत्रालयात करण्यात आली असून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपवून त्वरीत नवीन पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

२०१६ पासूनची ही चौथी बदली

मुंढे जिथे जातात तिथे कामाचा धडाका लावतात. गेल्या बारा वर्षांत त्यांची दहा वेळा बदली झाली असून ही त्यांची अकरावी बदली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षांतील, म्हणजेच २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे. नाशिकच्या आयुक्त पदी ते केवळ नऊ महिनेच कार्यरत राहिले आहेत. नाशिकमध्येही त्यांनी कामाचा धडका लावला होता, अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली होती.

का झाली बदली?

मुंढे आणि नाशिकमधील नगरसेवकांमध्ये सातत्याने वाद सुरू होते. त्यामुळे मुंढेच्या बदलीची मागणी भाजपासहित सर्व पक्षीय नगरसेवकांकडून होत होती. त्यानुसार अखेर मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी मुंढे यांची बदली झाल्याचं वृत्त अखेर सोशल मीडियावरील अफवाच ठरली आहे. कारण मुंढे यांची बदली मुंबईत मंत्रालयात करण्यात आली आहे. मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सह सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंढे नाशिकमधून थेट मुंबईत दाखल होतील.

पुढील बातमी
इतर बातम्या