मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारकडून राष्ट्रपतींना 'इतके' पत्र रवाना

मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेली सुमारे ६ हजार पत्रे दिल्लीकडे रवाना करण्यात आली. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेली सुमारे ६ हजार पत्रे दिल्लीकडे रवाना करण्यात आली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात जन अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्य येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा करत असताना त्या आधीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तर या दिनाला आगळे महत्व प्राप्त होणार आहे आणि तसे व्हावे यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

त्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुमारे ४ हजार पोस्टकार्ड पाठवण्यात आली. पोस्टकार्डांचा हा दुसरा संच असून, या पूर्वी देखील एक संच राष्ट्रपतींना पाठवण्यात आला असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ट्विट करत देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महामहीम राष्ट्रपती यांना लिहिलेली सुमारे सहा हजार पत्रे आज मा. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहे ठाकरे यांच्या उपस्थितीत दिल्लीकडे रवाना करण्यात आली. याआधी सुमारे एक लाख २० हजार पोस्ट कार्ड्स पाठविण्यात आली आहेत. यावेळी माझ्यासह खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.', असं मंत्री देसाई यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या