मनोहर जोशी यांच्या समर्थकांची लागणार वर्णी

मुंबई - दादर म्हटले म्हणजे शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नावे डोळ्यासमोर येतात. पण एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी असलेले मनोहर जोशी हे मागील काही वर्षांपासून पक्षात मात्र नामधारीच आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थकही शांत बसून होते. त्यामुळे जोशी यांचे पक्षातील अस्तित्व संपले की काय असा प्रश्न सर्वांना पडत आहे. परंतु येत्या महापालिका निवडणुकीत जोशी सर आपल्या दोन समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्याच्या तयारीत असून, यामाध्यमातून जोशी सर हे पक्षातील अस्तित्व सिद्ध करणार आहेत.

मुंबईतील माहीममधील प्रभाग क्रमांक 182 मधून शिवसेनेच्यवतीने माजी महापौर मिलिंद वैद्य आणि माहिम व दादर या भागातील प्रभाग क्रमांक 191 मधून माजी महापौर विशाखा राऊत यांची नावे इच्छुकांच्या रांगेत पहिल्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही मनोहर जोशी यांचे समर्थक आणि माजी महापौर आहेत. बाळासाहेबांच्या निधनानंतर मनोहर जोशी यांची एकप्रकारे पक्षातून हकालपट्टीच करण्यात आली होती. परंतु पुढे जोशी सरांनी माफी मागत उद्धवच्या नेत्तृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतरही जोशी सरांना पाहिजे तसे स्थान मिळत नव्हते. पण मागील काही सेनेच्या बैठका आणि सभांमध्ये जोशी सरांना सन्मानाची वागणूक मिळायला लागली आहे. त्यामुळेच सरांचे समर्थक असलेल्या मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे.

प्रभाग क्रमांक 182 मधून शाखाप्रमुख अभय तामोरे यांचा पत्ता कापला जात आहे . वैद्य हे मागील अनेक महिन्यापासून पक्षात सक्रिय नाहीत. पण प्रभाग आरक्षणानंतर वैद्य हे शाखेत बसायला लागलेत. मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळवत ते कामालाही लागलेत. तर प्रभाग 191 मधून इच्छुक असलेल्या दीपक साने यांची पत्नी दीपाली साने आणि शाखासंघटक आरती किनरे यांचा पत्ता कट करून विशाखा राऊत यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. या प्रभागातून मनसेच्यावतीने विद्यमान नगरसेवक संदीप देशपांडे यांची पत्नी स्वप्नाली निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विशाखा यांचे नाव पुढे आले आहे. स्वप्नाली देशपांडे यांच्यासमोर विशाखा राऊत याच तगड्या उमेदवार आहेत, असेही आता विभागातील शिवसैनिकांचे म्हणणे आहे. विशाखा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशाप्रकारची चर्चा सुरु असल्याचे मान्य केले. मात्र, अशाप्रकारे कोणताही निर्णय पक्षाने घेतलेला नसून आपल्यालाही अशा काही सुचना मिळाल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या