पत्रकार संरक्षण विधेयक विना चर्चा मंजूर

पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून पत्रकारांना संरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. शुक्रवारी हे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले. पत्रकार हल्लाविरोधी विधेयकानुसार पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्ष तुरुंगात जावं लागू शकतं. पत्रकार वा माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास किंवा 50 हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होणार आहे. तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

कसं असेल पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयक

  • ज्या व्यक्तीचा मुख्य व्यवसाय पत्रकारिता आहे, एखादी व्यक्ती एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारी असेल, तसेच नियमित किंवा कंत्राटी काम करणाऱ्या पत्रकारांना या कायद्याचे संरक्षण असणार आहे.

  • संपादक, वृत्तसंपादक, उपसंपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस आणि मुद्रण शोधक या पदांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींना या कायद्यामुळे संरक्षण मिळणार आहे.

  • या विधेयकामध्ये पत्रकार किंवा प्रसारमाध्यमांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर तीन वर्षांपर्यंत कारावास तर 50 हजारांपर्यंत दंड किंवा दोन्ही एकत्र अशी शिक्षा देण्याची तरतूद आहे.

  • प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांतर्फे पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सुनावणी होणार

  • या प्रकरणांची तपासणी उपअधीक्षक पदाच्या खालच्या दर्जाचा अधिकारी करणार नाही

  • पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यावर आरोप सिध्द झाल्यास त्या व्यक्तीकडून वैद्यकीय खर्च वसूल केला जाईल

  • तसेच प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात हल्ला केल्याचे सिद्ध झालेल्या व्यक्तीकडून
    नुकसान भरपाई वसूल केली जाईल

  • या कायद्यानुसार पत्रकाराने खोटी केस दाखल केली तर त्यालाही तीन वर्षांपर्यंत कारावास तसेच 50 हजारांपर्यंत दंड किंवा दोन्ही एकत्र अशी शिक्षा देण्याची तरतूद आहे

पुढील बातमी
इतर बातम्या