ओमकार बिल्डर्सविरोधात मंत्रालयात रहिवाशांचं आंदोलन

आपली समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मालाड पूर्वेकडील रहिवाशांनी ओमकार बिल्डर्सविरोधात मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात गुरूवारी आंदोलन केलं. रहिवाशांना अपात्र ठरवून बिल्डर घरं देण्यास टाळाटाळ करत असल्याने सर्व रहिवासी बेघर झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं.

आंदोलकांचं म्हणणं काय?

या प्रश्नी न्याय मिळावा म्हणून नगरसेवकापासून गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधीना आम्ही भेटलो. पण अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नाही. मागील दीड वर्षांपासून आम्ही पश्चिम द्रूतगती मार्गावर आंदोलन करत होतो. तरीही सरकारने आमची दखल घेतलेली नाही.

आम्हाला विकासकाने अपात्र ठरवलं असून पुनर्विकास प्रकल्पात घरं मिळवण्यासाठी पात्र असल्याचं पत्र सरकारकडून आणण्यास सांगितलं आहे. एवढंच नव्हे, तर विकासक आम्हाला पैसे घेऊन जाण्यास किंवा मिरारोड-भाईंदर या ठिकाणी घरे घेण्यास सांगत असल्याचीही माहिती आंदोलकांनी दिली.

आम्ही गृहनिर्माण सचिव संजय कुमार यांच्याकडे निवेदन सादर केलंं असून आम्हाला आमच्या हक्काची घरे न मिळाल्यास आपलं आंदोलन सुरूच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दम्यान मंत्रालयाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सोडून दिलं.

२००७ साली ओमकार बिल्डरने शांताराम तलाव जानू भोईर गृहनिर्माण संस्थेशी पुनर्विकास करार केला. त्यानंतर २०११ पासून आमची घरे तोडण्यास सुरूवात केली. ५ वर्षे त्यांनी आपल्याला ठरल्यानुसार धानादेशाद्वारे पैसे दिले. मात्र, आता विकासक आपल्याला अपात्र ठरवून घरं देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे तब्बल ९४ कुटुंब बेघर झाली आहेत.

- बच्चूलाल चव्हाण, रहिवासी, जानू भोईर गृहनिर्माण संस्था

काय आहे प्रकरण?

मालाड पूर्वेकडील कुरार शांताराम तलावाजवळील जानू भोईर गृहनिर्माण संस्थेच्या शेकडो रहिवाशांना ओंकार विकासकाने अपात्र घोषित केल्याने अनेकांना हक्काची घरं मिळणार नाहीत. याठिकाणी गेल्या ४ वर्षांपासून इमारतींचं बांधकाम सुरु आहे. एकूण ६ इमारतींपैकी ३ इमारतींचं काम पूर्ण झालं असूनही विकासकाने गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना अपात्र घोषित केलं आहे. यावर नगरविकास विभाग आणि झोपू कार्यालयात खेटे मारूनही याबाबत योग्य दाखले मिळत नसल्याने थेट मंत्रालयातच आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचं आंदोलकांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या