तावडेंना एकदा तरी गाडीत बसू द्या; राजनाथ सिंग यांना मनसेचं साकडं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार सभांनी जोर धरला आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. यानंतर राज यांच्यावर टीका करणाऱ्यांचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही समाचार घेण्यात आला. नवी मुंबईचे मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून विनोद तावडे यांना एकदा गाडीत बसू देण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी करत त्यांची खिल्ली उडवली आहे. 

मोदी – शाह जोडीवर निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी शाह – मोदी यांच्याविरोधात सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. तसंच सोलापुरातील सभेदरम्यान डिजिटल व्हिलेज हरिसालमधील बाबी उघड केल्या होत्या. त्यानंतर तावडेंनी त्याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचं सांगत राज यांच्यावरही टीका केली.

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरे यांच्याशी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये भेट झाली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या टूरिंग टॉकिजची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी दिल्याची टीका तावडे यांनी एका पत्रकार परिषदेत केली. तसंच राज कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत, हे मनसेने जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. यानंतर मनसेनेही तावडे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली.

गृहमंत्र्यांना पत्र

यापूर्वी इचलकरंजीत झालेल्या सभेदरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विनोद तावडे यांना विनोदी नेता म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्षांनी राजनाथ सिंह यांना पत्र लिहून तावडेंना आपल्या गाडीत बसू देण्याची संधी देण्याची मागणी केली आहे. 


हेही वाचा -

उर्मिला यांच्या प्रचार रॅलीदरम्यान पुन्हा मोदींच्या घोषणा


पुढील बातमी
इतर बातम्या