मुंबईतील सर्व जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर

आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार मुंबईतील सर्वच जागांवर शिवसेना - भाजपा युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी प्रत्येकी ३ जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर पिछाडीवर आहेत. भाजपाचे गोपाळ शेट्टी जवळपास ७० हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाच्या पूनम महाजन काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यापेक्षा जवळपास ३५ हजारांनी पुढे आहेत. तर उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपाचे मनोज कोटक यांना आतापर्यंत २ लाख ११ हजार मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांना १ लाख ४५ हजार मतं मिळाली आहेत. कोटक यांचं मताधिक्य वेगाने वाढत आहेत. चुरशीची लढत असलेल्या दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे मिलींद देवरा पिछाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यापेक्षा जवळपास ४० हजारांची आघाडी घेतली आहे. तर उत्तर पश्चिममधून काँग्रेसचे संजय निरूपम पिछाडीवर आहेत. येथील  शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी आघाडी घेतली आहे. 

कल्याण मतदारसंघातही शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. तर ठाण्यातून शिवसेनेचे राजन विचारे आणि भिवंडीतून भाजपाचे कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या