Lok Sabha 2024 : अभिनेत्री स्वरा भास्कर मुंबईत काँग्रेसच्या जागेवर निवडणूक लढवणार?

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने, काँग्रेसने गुरुवारी रात्री महाराष्ट्रातील सात जागांसाठी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गुरुवारी जाहीर केलेल्या एकूण 57 उमेदवारांपैकी सात जणांना संधी दिली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षात दोन नावांची ठळकपणे चर्चा झाली आहे. अभिनेता राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावाची चर्चा आहे. 

विशेषत: दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीनंतर स्वरा भास्कर ही काँग्रेसची निवड होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाचे मोक्याचे महत्त्व लक्षात घेऊन या महत्त्वाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सर्वांचे लक्ष लागले आहे.

अलीकडेच अभिनेत्री स्वरा भास्करने काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आणि आगामी निवडणुकीत स्वरा यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले.

स्वरा भास्कर नेहमीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर तिचे मत मांडत असते. तिने वारंवार तिच्या पोस्टद्वारे सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. त्यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार

दक्षिण मुंबई लोकसभेची जागा भाजपा राज ठाकरेंना देण्यास तयार नाही

पुढील बातमी
इतर बातम्या