मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, मुख्यमंत्री थोडक्यात बचावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर गुरूवारी लातूरमधील निलंग्याहून मुंबईकडे परतत असताना कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात मुख्यमंत्री थोडक्यात बचावले असून सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दीड मिनिटांत अंदाजे 50 फुटांच्या उंचीवरुन हे हेलिकॉप्टर खाली कोसळले. अपघात घडताक्षणीच मुख्यमंत्र्यांना तात्काळ हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण परदेशी आणि इतर दोघेजण होते. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीच्या मालकीचे असून 4 ते 5 वर्षे जुने असल्याची माहिती पुढे येत आहे.



या अपघातात मला कुठलीही दुखापत झालेली नसून लोकांच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे सुखरुप आहे. डॉक्टरांनी माझी पूर्ण वैद्यकीय तपासणी केली आहे. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लवकरच मी लातूरहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



मुख्यमंत्री फडणवीस मागील दोन दिवसांपासून लातूरमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने थांबलेले होते. यापूर्वी गडचिरोलीच्या दौऱ्यावर गेलेले असताना फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ऐनवेळी बिघाड झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नाईलाजाने अहेरी ते नागपूर असा 4 तासांचा प्रवास कारमधून करावा लागला होता.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोन करून मुख्यमंत्र्याची विचारपूस केली.

पुढील बातमी
इतर बातम्या