आंतरराष्ट्रीय योग दिन : मुख्यमंत्र्यांसह उपराष्ट्रपतींनी केला योगा

जगभरात 21 जून रोजी चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बीकेसीत आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मरीन ड्राइव्ह येथे योगासनं करून योग दिन साजरा केला.

मुख्यमंत्र्यांनी केला योगा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीकेसी येथील योगपार्कमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, भाजपच्या खासदार पुनम महाजन, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि गायक शान यांनीही सहभाग नोंदवला.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग हा आरोग्यासाठी उत्तम उपाय असल्याचं म्हणत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा प्रस्ताव मांडला आणि त्याला जगभरात मान्यता मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.  सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योगा करणं आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असं अावाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यावेळी केलं.

 

प्रकाश जावडेकरांनीही केला योगा

यावेळी मरीन ड्राईव्ह येथे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांसह पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी योगा केला. त्यांच्या सोबत मुंबई पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.

 

भारताचा प्रस्ताव जगात मान्य

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा या भारताच्या मागणीला संयुक्त राष्ट्रानं 2014 मध्ये मान्यता दिली. त्यानंतर 2015 पासून 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने 150 देशांमध्ये योगदिनाचे कार्यक्रम राबवले जात आहेत.

योगदिन 21 जूनलाच का? 

21 जून हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धात हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातल्या अनेक भागांमध्ये या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सूर्याचं दक्षिणायण सुरु होतं. अर्थात सूर्य दक्षिणेकडे कलू लागतो. सूर्याचं दक्षिणायण सुरु झाल्यानंतरची पहिली पौर्णिमा म्हणजेच पूर्ण चंद्र दिसणारा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगाविषयीचं ज्ञान जगासमोर आणलं. शिवाय सूर्याच्या दक्षिणायण कालात आध्यात्मिक पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी नैसर्गिक परिस्थितीही अनुकूल असल्याचं मानलं जातं.

पुढील बातमी
इतर बातम्या