वाचा महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्यांचा संघर्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी इतिहासापासून भाऊबंदकीचा वाद आहे. पेशवाईच्या काळात तर काका-पुतण्यातील राजकिय संघर्ष टोकाला गेला. ‘काका मला वाचवा’ म्हणून पळत येणाऱ्या नारायणराव पेशव्यांनी राघोबादादाला दिलेली हाक आजही राजकारणात दिली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, श्रीमंत अभयसिंहराजे भोसल- छ. उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे-अवधूत तटकरे यांच्या घरातील कलह उभ्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले होते. त्यातच आता भर पडली ती पवार घराण्याची, शरद पवारांचा विश्वासघात करत आज अजित पवारांनी भाजपशी हात मिळवणी केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला.

पक्ष कोणताही असो महाराष्ट्राच्या  राजकारणात काकांची भूमिका अतिशय महत्वाची राहिलेली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक काका-पुतण्यांच्या जोडय़ा असल्या तरी त्यातील शरद पवार आणि अजित पवार ही जोडी वगळता सर्व जोडय़ा या परस्परविरोधी ठरत होते. मात्र महाविकासआघाडीच्या  सत्तास्थापनेची घोषणेसाठी अवघे काही तास उरले असताना. शरद पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पहाटे भाजपसोबत जात राजकिय भूकंप घडवला. शरद पवारांना कोणतिही कल्पना न देता अजित पवार यांनी भाजपसोबत जात, रातोरात भाजपला बहुमतचा आकडा गाठण्यासाठी मदत केल्याने एकच वादंग निर्माण झाला. या राजकिय घडामोडीनंतर पवार घराण्यात उभी फूट पडली असल्याचे बोलले जाते.  

काका पुतण्यांमध्ये मतभेद होऊन वेगळे होण्याची महाराष्ट्रातील ही काही पहिली वेळ नाही. शिवसेनाप्रमुखांचा उत्तराधिकारी म्हणून महाराष्ट्र राज ठाकरे यांच्याकडे पाहत होता. पण पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आणि काका-पुतण्यात अंतर पडले. तर भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. भारतीय जनता पक्ष किंवा तत्पूर्वीच्या जनसंघाला जो एकेकाळी ब्राह्मणी चेहरा होता, तो बदलून बहुजनांचा चेहरा देण्याचे फार मोठे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांनी आपला पुतण्या धनंजय मुंडे यांना सर्वकाही दिले, मोठे केले. हाताचे बोट धरून राजकारणात आणले, पण हाच पुतण्या काकाच्या विरोधात जाऊन शत्रूच्या गोटात शिरला. अर्थात अनेक धक्के पचवायची सवय असलेले गोपीनाथ मुंडे यामुळे डगमगले नाहीत. मुंडे पाठोपाठ बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील वाद मध्यंतरीच्या काळात उफळून आला. २०१४ च्या विधानसभेला निवडणूकीपूर्वी जयदत्त क्षीरसागरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. निवडून आल्यानंतर जयदत्त यांना फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीपद देण्यात आले. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणूकीत जयदत्त यांना त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी आवाहन देत पराभव केला.  

सातारच्या राजघराण्यातून १९७८ पासून १९९९ पर्यंत सातारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आणि कॅबिनेट मंत्रीपदे भूषविणारे नेते म्हणजे श्रीमंत अभयसिंहराजे भोसले. जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रवासात ते सतत वसंतदादा पाटील आणि नंतर शरद पवारांबरोबर राहिले. संयमी कार्यशैलीने त्यांनी आपले वजन तयार केले असतानाच १९९० च्या दशकात राजकीय वयात आलेले छत्रपती शिवरायांचे थेट वंशज छ. उदयनराजे भोसले हे काकांच्या विरोधातच राजकारणात उतरले. पुढे उदयनराजे यांचे राजकीय प्रवाह बदलत गेले. २०१९च्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले उदयन राजें आणि दिवंगत श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांचे पुत्र शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे थोडाकाळ मनोमीलन झाले.  राजे घराण्यातील संघर्षानंतर चर्चा आहे ती, तटकरे कुटुंबातली राष्ट्रवादी काँग्रेसशी  एकनिष्ठ राहिलेल्या तटकरे कुटुंबात धुमसणारा काका-पुतण्याचा वाद  विधानसभेच्या ऐन निवडणूकीत शिगेला पोहचला. त्यातून राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.

पुढील बातमी
इतर बातम्या