हे पहा डिजिटल इंडियाचं वास्तव! शासन निर्णयाची वेबसाइटच झाली क्रॅश...

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • सत्ताकारण

डिजिटल इंडिया म्हणून गाजावाजा करणाऱ्या सरकारचं पितळ अाता उघडं पडत चाललं असून शासनाच्या निर्णयांची माहिती देणारी वेबसाइटचं क्रॅश झाली अाहे. शुक्रवारी दुपारपासून ही वेबसाइट ओपन होत नसून त्यामुळे शासन निर्णयांची माहिती घेणाऱ्या लोकांची मोठी पंचाईत होत आहे. तसंच मंत्रालयीन अधिकाऱ्यांमध्येसुद्धा नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

अनेक विभागांची माहिती होते अपलोड

www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर राज्य सरकारच्या जवळपास ३६ विभागांसह नव्याने निर्माण झालेल्या आणखी ३ विभागांची माहिती सातत्याने अपलोड करण्यात येते. त्याचबरोबर या संकेतस्थळामध्येच राज्य सरकारच्या इतर विभागाच्या वेबसाइटची लिंक जोडण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. राज्य सरकारचं संकेतस्थळ सहसा बंद पडू नये अथवा क्रॅश होवू नये, यासाठी राज्य सरकारच्या आयटी विभागाकडून सतत प्रयत्न केले जातात. मात्र शुक्रवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास संकेतस्थळ ओपन होण्यास वेळ लागू लागला. त्यानंतर ही वेबसाईटच क्रॅश झाल्याचा मेसेज संकेतस्थळावर येऊ लागला.

सरकारची तंत्रज्ञानात प्रगती की अधोगती?

आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर मंत्रालयीन अधिकारीही उत्तरं देण्यास टाळाटाळ करत आहेत. दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ट्विटर अकाउंटही हॅक झाले होते. आता तर चक्क शासनाची वेबसाईटच क्रॅश झाली आहे. त्यामुळे नक्की नवीन सरकार तंत्रज्ञानात प्रगती करत आहे की अधोगती? सरकारच्या वेबसाइट आणि अकाउंट्स असुरक्षित नसतील तर सामान्यांनी काय करावं, असे सवाल अाता उपस्थित होऊ लागलेत.


हेही वाचा -

महसूलमंत्र्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

सांभाळून! लॅमिनेटेड, प्लास्टिकचं आधार कार्ड होऊ शकतं हॅक


पुढील बातमी
इतर बातम्या